नाव त्याचं 

 महाराष्ट्र माझा होता अंधारात

औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
 डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग

नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी

म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना

बसून त्यानं दख्खनच्या भूमींत
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची

नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”


एक शिवकवी 




posted under | 0 Comments

।। किल्ले वासोटा (व्याघ्रगड) ।।



इतिहास : 

या किल्ल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व होते. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. १६५६ मध्ये शिवाजीराजांनी जावळी प्रांताबरोबरच या वासोटा किल्ल्याचाही स्वराज्यात समावेश केला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे.
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत 'वसिष्ठ' हे नाव अपभ्रंश होऊन 'वासोटा' झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत 'वसंतगड' या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोटा बखरीवरून शिवरायांनी जावळी
विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोटावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

सह्याद्रीची मुख्यरांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते . या जावळी खोऱ्यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरु होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने गेल्यावर आपण पूर्वेकडील बाजूस पोहोचतो. या बाजूने दिसणारा शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते.

गडावर कसे जाल :

वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जाऊ शकतो.
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.

राहण्याची सोय:  राहण्याची सोय नाही.

पाण्याची व जेवणाची सोय : स्वतःच करावी.

जाण्यासाठी लागणारा वेळ: साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो.


                                                                           सूरज बबन थोरात



posted under | 0 Comments

शिवाजी महाराजांवरील कविता


टेकूनी माथा जया चरणीमी वंदन ज्यासी करितो...नित्यारोज तयांचेनवे रूप मी स्मरितो...

न भूतो न भविष्यती ऐसे ची होते माझे शिवछत्रपती...जन्मले आई जिजाऊ उदरी पावन झाली अवघी शिवनेरी...

ऐकत असता पोवाडा सदरी त्यात वर्णिली राणी पद्मिनी...रजपूत राणी सुंदर विलक्षणी कैद झाली मोघल जनानखानी...

चरचर कापले हृदय शिवरायांचे डोळ्यात दाटले अश्रू संतापाचे...कडाडले शिवरायsssआम्ही आहो वंशज रामरायाचे दिवस भरले आता मोघलांचे...

ज्याची फिरेल नजर वाकडी आईबहिणीकडे....त्याच क्षणी शीर मारावे हुकुम घुमला चोहीकडे...

काबीज करता कल्याण-भिवंडी अमाप आला हाती खजिना...वेळ न दवडिता सरदारांनी सादर केला एक नजराणा...

कल्याण सुभेदाराची स्नुषा विलक्षण सुंदर...उभी होती राजांपुढती झुकुवूनी घाबरी नजर...

धीमी पाऊले टाकीत राजे तिज जवळी आले...रूप पाहुनी विलक्षण सुंदरराजे पुढे वदले....

जर का आमच्या मांसाहेबइतक्या सुंदर असत्या.....आम्ही तयांचे पुत्र लाडके असेच सुंदर निपजलो असतो....

वंदन तुजला शतदा करतो धन्य तू शिवराया....स्त्री जातीचा मान राखुनीतूच शिकविले जगाया....!


                                                                                           एक शिवकवी




posted under | 0 Comments

शिवरायांचे खासगी आयुष्य


आपल्या सगळ्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल खुप कुतुहल असतं. शिवाजी महाराज स्वभावने कसे असतील, लढायांव्यतिरीक्त त्यांचं आयुष्यं कसं असेल, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. शिवछत्रपतींविषयीच्या अस्सल साधनांतून यातल्या काही प्रश्नांची उत्तरे पुर्ण स्वरूपात नाही, पण अंशतः शोधता येतात...शिवाजी महाराजांच्या स्वभावाविषयी बखरींतून अन् पत्रांतून काही अंदाज बांधता येतात. ते असे की, शिवाजी महाराज स्वभावाने शांत पण तितकेच उग्र होते. विशेषतः भडकले म्हणजे कोणालाही आवरता येणार नाहीत असे. इंग्रजांचे शासन हे अतिशय शिस्तप्रिय होते असे बोलले जाते, परंतू महाराजांचे शासन हे त्याहूनही शिस्तबद्ध, काटेकोर आणि अतिशय स्पष्ट होते. महाराजांच्या शिस्तबद्धतेची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. शिवाजी महाराजांच्या लहानपणी जिजाबाई आईसाहेबांच्या रांझे गावातील बाबाजी बिन भिकाजी गुजर या पाटलाने एका स्त्रिवर बदअंमल म्हणजेच बलात्कार केला. हे समजताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब त्याला पकडून आणून त्याचा चौरंगा करण्याचा हुकूम सोडला. चौरंगा म्हणजेच, कोपरापासून दोन्ही हात आणि गुढघ्यापासून दोन्ही पाय तोडणे ! पुढे अफजलखान स्वारीच्या वेळी मावळातील सारे देशमुख महाराजांच्या बाजूने लढले, पण उत्रवळीचा खंडोजी खोपडे देशमुख मात्र वतनाच्या हव्यासापोटी खानाला जाऊन मिळाला. पुढे महाराजांनी खानाला मारले, पण खंडोजी मात्र पळाला. तो अतिशय घाबरलेला होता. आपले जावई हैबतराव शिळमकर यांच्यामार्फत त्याने कान्होजी नाईक जेधे देशमुख यांच्याशी गुप्त बोलणे लावले. शेवटी कान्होजींनी खंडोजीसाठी महाराजांकडे शब्द टाकला. कान्होजीराजांसारख्या ज्येष्ठाचा शब्द महाराजांनीही मानला आणि खंडोजीला अभय दिले. एके दिवशी खंडोजी महाराजांकडे मुजरा करायला आला असता महाराजांनी एकदम त्याला पकडण्याचा आदेश दिला. खंडोजीला जेरबंद करण्यात आले. त्याचा डावा हात आणि उजवा पाय कलम करण्यात आला. मग महाराजांनी खंडोजीला अभय दिले होते ना ? तरीही शिक्षा का केली ? इथेच खरे शिवाजी महाराज समजतात ! त्यांनी खंडोजीला जिवाचे अभय दिले परंतू शिक्षा केली कारण लोक म्हणतील की स्वराज्यात कोणताही गुन्हा केला तरी चालतो, फक्त कान्होजी जेध्यांसारखा वजनदार वशिला हवा बस्स ! तर तसे होणे नाही...राज्याभिषेकाच्या आधी, १५ एप्रिल १७३३ रोजी, सरनौबत प्रतापराव गुजर यांनी विजापूरचा सरदार बहलोलखान पठाण शरण येऊन हातात आला असतानाही त्याला मोकळे सोडून दिले. परंतू प्रतापरावांनी ही फार मोठी चूक केली होती. कारण महाराजांनी त्यांना स्वारीवर निघतानाच महाराजांनी त्यांना बजावले होते, “ जो कोणी सरदार- सेनापती येईल त्याला शक्य तोवर जिवंत कैद करा. अगदीच जमलं नाही तर बुड्वा, मारा !”. पण प्रतापरावांनी त्याला जिवंत मोकळा सोडून दिला. शत्रूवर कधीही भरवसा ठेवायचा नसतो. बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालून आल आणि येताना पूर्वीपेक्षा दुप्पट सैन्यासह ! महाराजांना हे पाहून फार राग आला. रागाच्या भरात त्यांनी प्रतापरावांना एक खरमरीत पत्र लिहीले, “ सल्ला काय निमित्य केला ? सल्ला करण्याचा अधिकार तुमचा नव्हे ! तो अधिकार आमचा व राजमंडळाचा. तुम्ही स्वतःस सेनापती म्हणवता मात्र केलीत ती फक्त शिपाईगिरी. आता बहलोलखान हरघडी येतो, तरी त्यास गर्देस मेळविल्याविना आम्हांस रायगडी तोंड दावू नये ! ”. महाराजांचा खरा राग बहलोलखानावर होता, पण महाराज आपल्यावरच नाराज झाले आहेत असे प्रतापरावांना वाटले. लवकरच महाराजांचा राज्याभिषेक होता. अशा वेळी रायगडावर अष्टप्रधानांतील सात प्रधान उपस्थित राहणार होते, पण सरसेनापती मात्र तेथे नसणार होते. म्हणून शेवटी सूडाच्या भावनेनी पेटलेल्या प्रतापरावांनी अवघ्या सात सैनिकांच्यानिशी गडहिंग्लज-नेसरीच्या जवळच असणार्याप बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला चढवला. चाळीस हजारांच्या फौजेवर अवघे सात जण तुटून पडले. शेवटी व्हायचं तेच झालं, प्रतापराव मारले गेले. शिवाजी महाराजांना प्रतापरावांच्या मरणाचा फार मोठा धक्का बसला. त्यांचं मन कळवळलं. आपल्या केवळ एका पत्रामूळे प्रतापरावांनी आत्महत्या केली होती. महाराजांनी प्रतापरावांच्या कुटूंबाचं सांत्वन केलं. प्रतापरावांच्या मुलाला, नागोजी उर्फ शिदोजी बिन कुड्तोजी गुजराला त्यांनी सिंहगडासारख्या महाबलाढ्य किल्ल्याची किल्लेदारी दिली. पुढे प्रतापरावांच्या मुलीचा, जानकीबाई हीचा विवाह आपले धाकटे पुत्र राजाराम यांच्याशी लावून दिला. पण याच नागोजी उर्फ शिदोजी गुजराने पुढे एक चूक केली. जेजूरीच्या घडश्यांना चिंचवडकर देवांच्या सांगण्यावरून सिंहगडावर कैदेत डांबले, तेव्हा शिवाजी महाराजांनी नागोजीला सख्त ताकीद दिली. त्यावेळेस त्यांनी त्याला सहानुभूती दाखवली नाही. शिवाय चिंचवडकर नारायण देवांनाही त्यांनी ठणकावीले, ‘तुमची बिरदे आम्हांस द्या, व आमची बिरदे तुम्ही घ्या !’ म्हणजे तुम्ही राज्यकारभार करा, आम्ही तुमच्या जागी चिंचवडास जाऊन धुपारत्या करत बसतो !महाराज हे अतिशय कलाप्रिय होते. शाहीर अज्ञानदासासारख्या आणि यमाजींसारख्या शाहीरांकडून ते अनेक पोवाडे ऐकत असत. केशव पंडित, कविंद्र परमानंद नेवासकर, यांसारख्या महापंडितांकडून विविध विषयांवर ज्ञान घेवून त्यांच्याबरोबर चर्चाही करत असत. मोकळ्या वेळात अनेक सवंगड्यांबरोबर, शास्त्री-पंडितांबरोबर आणि कलावंतांबरोबर उठता-बसता महाराजांचे मन फुलत गेले आणि त्यांची बुद्धीही समृद्ध होत गेली. महाराजांच्या गडकोट बांधणी, न्यायनिवाड्यांवरून, पत्रांवरून त्यांचा राज्यशास्त्रावर, व्यवहारशात्रावर, खगोलशास्त्रावर, वास्तुशास्त्रावर इतिहास-पुराणांवर आणि परमार्थावर किती अभ्यास होता हे कळून येते. मराठी भाषा ही संस्कृत भाषेची धाकटी बहीणच आहे. त्यामुळे महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून ‘राज्यव्यवहारकोश’ या ग्रंथाची निर्मिती केली. राज्यव्यवहारतल्या पेशवे, सुरनिस, मुजुमदार, सरनौबत, डबीर अशा शब्दांना पंतप्रधान, पंतसचिव, सरसेनापती, पंतअमात्य, पंतसुमंत अशी अस्सल मराठी नावे दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझा मराठाची बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके, मेळविन ॥’ अशा शब्दात गौरव केला. पण नंतर मराठी भाषा हळूहळू लयाला जात चालली होती. संत नामदेव, संत एक्नाथ, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या अमृतवाणीतून मराठीचे काही झरे पाझरत होते. शिवाजी महाराजांनी मराठीला एक नवी संजिवनी देण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या पूर्वीच्या पत्रांच्या सुरवातीला लिहिण्यात येणारा ‘मशहुरूल अनाम, अजरख्तखाने, वजारतमाब..’ असा मायना शिवाजी महाराजांनी कायमचा बदलून त्याठिकाणी ‘अखंडीत लक्ष्मी अलंकृत, सकळ गुणालंकरण, राजश्रीया विराजीत, विश्वांसनिधी..’ अशी अस्सल मराठी विशेषणे लावयला सुरुवात केली.शिवाजी महाराज स्वभावने खेळकरही होते. आपल्या समोर शिवाजी महाराजांची मूर्ति उभी राहते ती अंगात चिलखत घातलेली, डोक्यावर शिरस्त्राण असलेली, पाठीवर ढाल आणि कमरेला भवानी तलवार अडकवलेली ! पण हा महाराजांचा युद्धवेश होता. इतर वेळेस महाराजांचे कपडे अगदी साधे असत. गळ्यात मोजकेच अलंकार आणि कुलदेवता भवानीदेवीच्या कवड्यांची माळ. महाराजांना दोन पुत्र व सहा कन्या होत्या. महाराज त्यांच्याशी गप्पगोष्टी करण्यात व आपल्या राण्यांशी बोलण्यातही वेळ व्यतित करत असत. महाराजांची आजपर्यंत अस्सल अशी सात चित्र सापडली आहेत. ती चित्र द्विमितीय (प्रोफाईल) आहेत. पण या सर्व चित्रांतील शिवाजी महाराजांच्या मुखावर सूक्ष्म असं स्मितहास्य पसरल्याचं दाखवण्यात आलं आहे. जसं महाभारतात भगवान श्रीकृष्णाच्या चेहर्यारवर असतं. असे होते शिवाजी महाराज !आता शिवाजी महाराजांच्या लढायांव्यतिरिक्तच्या रोजच्या दिनचर्येबद्दल पाहू. महाराज वर्षातले बाराही महिने लढायला जात नसत हे तर उघडच आहे. अशा वेळी त्यांचा मुक्काम शक्य तोवर राजधानीवरच असे. स्वराज्याच्या सुरूवातीपासून इ.स. १६७२ पर्यंत राजगड हीच राजधानी होती. नंतर महाराजांनी राजधानीची जागा बदलून ती रायगडावर नेली. या काळात ते स्वराज्यातील इतर मुलकी कारभार पाहत असत. किल्ल्यांना वेळोवेळी भेटी देऊन त्यांच्या डागडुजीसंबंधी आज्ञा देणे, किल्ल्यांवरच्या सरदारांच्या नियुक्त्या करणे, किल्ल्यावर आणि फौजांना वेळच्या वेळी तोफा, दारुगोळा तसेच धान्यसाठा पुरवणे अशा अनेक कामांवर या मधल्या काळात देखरेख करावी लागत असे. महाराज पहाटे लवकर उठून स्नान आणि नित्याच्या स्फटीक शिवलिंगाची पुजा करत असत. नंतर आईसाहेबांचं दर्शन घेऊन, त्यांच्याशि बोलून गडावरच्या सदरेवर बसून न्यायनिवाडे, तंटे सोडवून लोकांचे प्रश्न सोडवले जात असत. बाळाजी आवजी चित्रे चिटणीसांना महाराज पत्राचा आशय सांगत असत. दुपारचे भोजन झाल्यानंतर वामकुक्षी घेतल्यानंतर महाराज गडाचा फेरफटका मारायला जात असत. रायगडावर असताना महाराज सायंकाळी श्री जगदिश्वराच्या दर्शनाला जात असल्याच्या नोंदी मिळाल्या आहेत. रात्रीच्या जेवणानंतर ते पुन्हा सदरेवर येत असत. या वेळी बाळाजी आवजी चिटणीसांनी तयार केलेल्या पत्रांवर नजर टाकून महाराज त्यांना पत्रातील काही गोष्टी सुचवत असत, आणि नंतरच ते पत्र पाटवण्याची आज्ञा दिली जात असे. त्यानंतर महाराज झोपायला जात असत. महाराजांच्या पदरी पंताजी गोपिनाथ बोकील नावाचे एक हुशार ब्राह्मण कारभारी होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी खानाला वेळीवेळी झुकवून प्रतापगडच्या पायथ्याशी आणण्याचे महत्वाचे कार्य याच पंताजीपंतांनी केले होते. मुळात ते महाराजांचे वकीलच होते, पण अशा या पंतांबद्दल एका पत्रात म्हटलय, ‘पंताजी तो काका, त्यांचा मायना ऐसा, की आऊसाहेबांच्या संगतीस बैसोनु चौसर खेळावा’. महाराजांनाही चौसर म्हणजेच सारीपाट आवडत असे...तर असे होते शिवाजी महाराज... महाराजांबद्दलच्या काही नोंदी आणि इतिहासकारांनी केलेल्या संशोधनातून, आणि अस्सल साधनांच्या वाचनातून ही माहिती संकलीत करून आपणापुढे मांडली आहे. काही त्रुटी अथवा चूक झाली असल्यास क्षमस्व.. बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.



                                                                                          सूरज बबन थोरात





posted under | 0 Comments

रायगड (किल्ला)



नाव                                      रायगड (किल्ला)
उंची                                      ८२० मीटर/२७०० फूट
प्रकार                                     गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी                     सोपी
ठिकाण                                    रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव                    रायगड
डोंगररांग                                    सह्याद्री
सध्याची अवस्था                    व्यवस्थित
रा
यगड किल्ला हा तत्कालीन लष्करी दृष्टीने अभ्यास करण्यासारखा किल्ला आहे. एखाद्या ताटात भाताची मूद ठेवावी तसा हा सर्व बाजूंनी अलिप्त असा डोंगर आहे. रायगड सह्यादीचा पराक्रमी पुत्रच आहे. रायगडाची प्रत्येक दिशा केवळ अजिंक्य आहे. भिंतीसारखे ताठ सरळ कडे पाहिले की , असं वाटतं , हा गड आपल्या अंगावर येतोय. पावसाच्या दिवसांत अन् त्यातल्या त्यात आषाढी पावसांत रायगड चढून जाणं हा एक अघोरी आनंद आहे. आषाढी ढगांची फौज गडाला गराडा घालून तांडव करीत असते. कधीकधी त्यातच वादळ घुसते अन् मग होणारा ढगांचा गडगडाट आणि विजांचाही कडकडाट आपण कधी अनुभवला आहे का ? वेळ दिवस मावळण्याची असावी , हे सारं थैमान सुरू झालेलं असावं अन् आपण गडावरच्या नगारखान्याच्या उत्तुंग माथ्यावर उभे असावं.

रणवाद्यांचा बेताल कल्लोळ , शिंगतुताऱ्यांचा आणि शंखांचा अचानक आक्रोश , रुदवीणांच्या तारा तुटाव्यात असा विजांचा सणाणत सणाणत उठणारा चित्कार पावसाच्या भयंकर वर्षावात डोळे उघडता येत नाहीत पण उघडले तर अवतीभवतीचा तो महाप्रलय कल्लोळ भयभयाट करीत आपल्याला गदागदा हलवत असतो. तो प्रलयंकाल , महारुद , क्षुब्ध सहस्त्रशीर्ष , दुगेर्श शिवशंकर आणि सर्व संहारक चंडमुंडभंडासुरमदिर्नी , उदंडदंड महिषासुरमदिर्नी महाकालिका दुर्गाभवानी भयंकर रौद तांडव एकाचवेळी करीत आहेत असा भास व्हायला लागतो. कभिन्न अंधार वाढतच जातो. रायगड हे सारं तांडव आपल्या खांद्यावर आणि मस्तकावर झेलीत उभा असतो. अन् त्याही भयानक क्षणी आपल्याला वाटायला लागतं , अर्जुनाला दिसलेलं कुरूक्षेत्रावरचं ते भयप्रद दर्शन यापेक्षाही किती भयंकर असेल!

असा हा पावसाळ्यातला रायगड , कोण जिंकायला येईल ? अन् बिनपावसाळ्यातला रायगड तरी ? तेही अशक्यच. शिवाच्या भोवती तांडव करणाऱ्या त्याच्या भूतप्रेत , पिशाच्च , समंधादि भयंकर शक्ती मावळ्यांच्या रुपानं रायगडावरती असायच्याच ना?

अशा रायगडात प्रवेश करण्याची कोणा दुष्मनाची हिंमत होती ? रायगडात प्रवेश करणं शत्रूला अशक्य होतं. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच शत्रूला रायगडावर प्रवेश मिळणं अशक्य होतं.

या रायगडावर शिवाजीमहाराजांनी राजधानी आणली. हिरोजी इंदुलकरासारखा कुशल बांधकामगार महाराजांनी गडावरच्या तटाकोटाबुरुजांसाठी आणि अन्य बांधकामांसाठी नामजाद केला. हिरोजी कामाला लागला. रायगडाच्या अंगाखांद्यावर श्रावणातल्या गोकुळासारखं बांधकाम सुरू झालं. गडाचे कडे आणखी अवघड करण्यासाठी सुरुंगांच्या बत्त्या शिलगावल्या जाऊ लागल्या. सुरुंगांचे पडसाद दाही दिशांस घुमू लागले. महादरवाजा , चित्ता दरवाजा , नाणेदरवाजा , वाघ दरवाजा अन् अवघड सांदीसापटीत बांधलेला चोरदरवाजाही अंग धरू लागला. तीन मनोरे रूप घेऊ लागले. नगारखाना , सातमाडी महाल , पालखी दरवाजा , मेणा दरवाजा , शिरकाई भवानीचं देऊळ , कुशावर्त तलाव , गंगासागर कोळंब तलाव पाण्याने भरू लागले. कमीजास्त चाळीस बेचाळीस दुकानांची दोरी लावून सरळ रांग उभी राहिली. मधे रस्ता , समोर दुसरी रांग. जगदिश्वराचं भव्य मंदिर उभं राहिलं. असा रायगड पगडीवरच्या कलगीतुऱ्यांनी अन् नऊ रत्नांच्या फुलदार जेगो चौकड्यांनी सजवावा तसा हिराजीने सजवला.

केवळ राजधानीचा किल्ला म्हणून तो सुंदर सजवावा एवढीच कल्पना रायगडच्या बांधणीबाबतीत नव्हती. तर एक अजिंक्य लढाऊ किल्ला म्हणून गडाचं लष्करी महत्त्व महाराजांनी आणि हिराजीनं दक्षतापूर्वक लक्षात घेतलं आहे. गडावरच राजघराण्याचं वास्तव्य राहणार असल्यामुळे राजस्त्रियांची राहण्याची व्यवस्था हिराजीने खानदानी पडदा सांभाळून केली. या विभागाला बादशाही भाषेत म्हणत असत , ' झनानखाना ' किंवा ' दरुणीमहाल ' किंवा ' हरमखाना '. पण रायगडावर या कौटुंबिक राजवाड्याला म्हणत असत ' राणीवसा ' या राजकुटुंबाच्या विभागात प्रवेश करण्याकरिता स्त्रियांसाठी दक्षिणेच्या बाजूस एक खास दरवाजा बांधला. त्याचं नाव मेणादरवाजा. बारद्वारी आणि बाराकोनी उंच झरोक्याचे दोन मनोरे गडावर बांधले या मनोऱ्यात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी कारंजी केली. भिंतींशी लोडतक्के ठेवून सहज पंधरा- सोळा आसामींनी महाराजांशी गोष्टी बोलण्याकरता वा राजकीय चर्चा करण्याकरता बसावं , अशी जागा मनोऱ्याच्या दोन्ही मजल्यांवर ठेवली आहे.

दिवे लावण्याकरता सुंदर कोनाडे आहेत. झरोक्यांवर पडदे सोडण्याकरता गोल कड्याही ठेवल्या आहेत. आबदारखाना , फरासखाना , शिलेखाना , जिन्नसखाना , दप्तरखाना , जामदारखाना , मुदपाकखाना इत्यादी सारे महाल , दरख आणि कोठ्या गडावर बयाजवार होत्या. रात्री सगळीकडे दिवेलागण व्हायची. नगारखाना कडकडायचा. सनईचे सूर कोकणदिव्याला साद घालायचे. गडाचे सारे दरवाजे कड्याकुलुप घालून बंद व्हायचे. तोफ उडायची. गस्तीच्या पाहरेकऱ्यांच्या आरोळ्या लांबून लांबूनही उठायच्या. मशाली पेटायच्या. अन् सारे व्यवहार तेवढ्या प्रकाशात गडावर चालायचे. देवघरात अन् राजवाड्यात उदाधुपाचे अन् चंदनाचे सुगंध दरवळायचे. अन् देवघरात जगदंबेची आरती निनादायची. असा रायगड डोळ्यापुढं आला की मन फार सुखावतं. आजचा उद्ध्वस्त भकास आणि आम्ही लोकांनीही सिगरेटची थोटकं , दारुच्या रिकाम्या बाटल्या , अन् खरकटे प्लॅस्टिकचे कागद आणि पिशव्या अस्ताव्यस्त फेकून अन् ठिकठिकाणी भिंतींवर आपली नावं लिहून विदुप केलेला गड पाहिला की , स्वत:च्याच मनाला सुरूंग लागतो. त्याच्या चिंधड्या उडतात. अन् वाटतं , ' तुझ्या विछिन्न रूपाला , पाहुनि फाटतो ऊर…

Ø भौगोलिक स्थान
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १७ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवाजीचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.

Ø इतिहास
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.
Ø सभासद बखर म्हणते
“राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”
याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर.

Ø शिवराज्याभिषेक
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.
Ø कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की
“शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’ इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरूवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ.स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.”

Ø गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
२. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
३. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध नाना फडणिसांशी लावला जातो अशी गैरसमजूत आहे. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
४. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा : चित्‌दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
५. महादरवाजा : महादरवाज्याच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विा व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवडा दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
६. चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.
७. हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.
८. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थेयाच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
९. स्तंभ : गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्र्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
१०. पालखी दरवाजा : स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
११. मेणा दरवाजा : पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ – उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
१२. राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
१४. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
१५. नगारखाना : सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
१६. बाजारपेठ : नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरुन आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे.
१७. शिर्काई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ. शिर्काई ही गडावरील मुख्य देवता.
१८. जगदीश्र्वर मंदिर : बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्र्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्‍याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे - श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्र्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्र्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
१९. महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्र्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्‍याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्र इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.
२०. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेत नंदी दिसतो.
२१. वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
२२. टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरुन टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी
२३. हिरकणी टोक : गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्‍यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.

Ø रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेलो, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वार्‍याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणार्‍याला जाणवते.
शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते.

गडावरील राहायची सोय                 गडावर रहायची सोय आहे.
गडावरील खाण्याची सोय               गडावर खाण्याची सोय आहे पण स्वत:च्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन जावे.
गडावरील पाण्याची सोय                 पाण्याचे अनेक तलाव गडावर आहेत. पाणी मुबलक.
गडावर जाण्याच्या वाटा                   गडावर जाण्यासाठी आता एकूण दोन मार्ग आहेत. १. पायवाट २. पाळणा
जाण्यासाठी लागणारा वेळ              पायथ्यापासून चालत गेलात तर अंदाजे १ तास पाळण्याने गेलात तर ५ मिनिटे.



रायगडची पायथ्यापासूनची उंची २२५० फूट आहे आणि गडाचा महादरवजा १८५० फुटांवर बांधलेला आहे. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून, एक ७५ फुट उंच तर दुसरा ६५ फुट उंच आहे.‘सर्पाकृती’ बांधकाम असलेल्या या मार्गाची रूंदी सुरवातीला १६ ३/४ फूट व आत शिरेपर्यंत फक्त ८ १/२ फुट आहे.  

Ø रायगडचे वाचन
रायगडची पायथ्यापासूनची उंची २२५० फूट आहे आणि गडाचा महादरवजा १८५० फुटांवर बांधलेला आहे. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून, एक ७५ फुट उंच तर दुसरा ६५ फुट उंच आहे.‘सर्पाकृती’ बांधकाम असलेल्या या मार्गाची रूंदी सुरवातीला १६ ३/४ फूट व आत शिरेपर्यंत फक्त ८ १/२ फुट आहे. आणि म्हणूनच कितीही मोठया संख्येने आलेल्या शत्रूला महाद्वारात प्रवेश करताना दोन दोन किंवा तीन तीन च्या गटापेक्षा जास्त संख्येनी आत शिरणे शक्यचं नाही. या बुरूजाच्या, तटबंदीच्या भिंतीची जाडी २ फुटांपासून ४ फुटांपर्यंत आहे. बांधणी शास्त्राचे विशेष सांगायचे तर ते असे, की महादरवाजासमोर आपण जाऊन पोहचलो तरीही, दरवाजा कुठेच दिसत नाही. दर्शन होते ते फक्त महाकाय बुरूजांचे शत्रुला बुरूजांना समोर घालून दरवाजा बांधावा असा ‘आज्ञापत्रात’ उल्लेख आहे. ’किल्ला’ हा शब्द उच्चारल्याबरोबर कुणाच्याही डोळयासमोर प्रथम ‘बुरूज’ उभा राहतो. सिंधु दुर्गाच्या बांधकामात ४२ बुरूज आहेत, हे सांगून कदाचित आश्चर्य वाटेल. तटबंदीच्या मजबुतीचा बुरूजांशी अतिशय निकटचा संबंध आहे. सरळ सरळ बांधलेली तटबंदी तोफेच्या गोळयांनी किंवा हत्तीच्या धडकेने पडण्याची शक्यता असते, पण बुरूजांच्या अर्धगोलाकृती बांधणीमुळे त्यांची मजबुती फारच वाढते. संरक्षणाच्या दृष्टिनेही बुरूज मोठी कामगिरी बजावू शकत.

Ø गोमुख बांधणी
प्रवेशद्वाराची ‘गोमुख’ बांधणी हे शिवनिर्मित दुर्गांचं आणखी एक वैशिष्टय| गडावरच्या मुख्य भागापासून बरेच दूरवर, खाली प्रवेशद्वार बांधणे, म्हणजे गोमुख बांधणी. बालेकिल्ल्यापासून रायगडचं महाद्वार हे कमीत कमी ४०० फुट खाली आहे. मंदिराच्या गाभारयातून अभिषेकाचे पाणी बाहेर येण्यासाठी, मंदिराच्या मागे खालच्या बाजूला ‘गोमुख’ असते. या गोमुखातून गाभाऱ्यात प्रवेश मिळवणं जितक कठीण, तितकच महाद्वारातून बालेकिल्ल्यापर्यंत पोहचणे मुष्किल आहे. ‘अन्नाचा पुरवठा असल्यास अल्प शिबंदीच्या सहाय्याने रायगड सगळया जगाविरूद्ध समर्थपणे लढु शकेल’, हा टॉमस निकल्सचा अभिप्राय रायगडची बांधणी पाहूनच, व्यक्त केला गेला आहे. इंग्रजांनी रायगडला पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हटले आहे, तेही एवढयासाठी.

रायगडवरील माझ्या वास्तव्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती अशी की, गडावरच्या सगळयाच म्हणजे जवळ जवळ ३५० वास्तुबांधणीमध्ये काहीना काही तरी विशेष दृष्टिकोन आहे. वास्तुशास्त्रीय दृष्टया शिवदुर्गांचा किंवा एकटया रायगडचा ही अभ्यास करणं, हे प्रचंड कार्य आहे, पण ते होणं अतिशय आवश्यक आहे. वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांनी या कार्यात लक्ष घातल्यास एक नवी दिशा शिवचरित्र अभ्यासकांना मिळू शकेल. रायगडच्या मी केलेल्या अभ्यासापैकी काही महत्वाचे मुद्दे या लेखाद्वारे मांडण्याचा माझा प्रयन्त आहे.

Ø “चमत्कार”
गडावरच्या वास्तव्यात, मला राजदरबारात अनेक चमत्कार असल्याचं सांगण्यात आलं. उदाहरणादाखल सांगायच तर अंस की, रायगडच्या पूर्वेला तोरणा किल्ला आहे जेथून महाराजांनी स्वराज्याचे पहीले तोरण बांधले आणि राजगड किल्ला स्वराज्याची पहीली राजधानी यांच्या मधुन उगवणाऱ्या सूर्याची प्रभात किरणं नगारखाण्याच्या कमानीतून येऊन, सिंहासनाच्या जागेवर पडतात. मला मोठ आश्चर्य वाटलं. तसेच माझी उत्सुकता, जिज्ञासा देखिल चाळवली गेली आणि मी विचार करू लागलो ‘हे खरचं शक्य आहे का?’ विचारांती, हे शक्य आहे असे वाटले, पण मग ही काव्यात्मकता, वास्तुशास्त्रीय माध्यमातून साधनारा महाराजांचा वास्तुशास्त्रज्ञ कोण, त्याने ही रचना कशी साधली, हा विचार अस्वस्थ करू लागला. सुदैवाने जगदीश्वराच्या प्रासादातील एका भिंतीवर शिलालेख आढळला. त्याचा अभ्यासकांनी दिलेला अर्थ पुढीलप्रमाणे ‘१५९६ शके आनंद नाम संवत्सराची ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या राज ज्योतिषांनी काढलेल्या किर्तीमान मुहूर्तावर, जो छत्रपती शिवनृपती सिंहासनाधिष्ठित झाला, त्याच्या अनुज्ञेने जगाला आनंद देणारा, हा जगदिश्वराचा प्रासाद ‘हिराजीने’ अनेक तळी, विहीरी, रम्य वनश्री, कुंभीगृहे राजप्रासाद, स्तंभ मिनार इत्यादिंनी मडित असलेल्या, वाणीला अवर्ण्य अशा श्रीमंत रायगडावर निर्माण केला. जोवर आकाशात चंद्र सुर्य नांदतील तोवर हा नांदत राहो.’
शिलालेखाची आणखी एक छोटीशी ओळ एका पायरीवर आहे ‘सेवेचे कार्य तत्पर हिराजी इंदुलकर’ म्हणजे रायगडवरील वर दिलेल्या यादीतील, सगळं बांधकाम हिराजींनी एकतर नवीन बांधले किंवा आधी होतं, त्याला राजधानीच्या दृष्टिने नवीन रूप दिले.
सुर्योदयासंबंधी हिरोजी इंदुलकारांनी केलेल्या, या रचनेची मी आधुनिक वास्तुशास्त्राच्या तत्वाप्रमाणे चिकित्सा केली आणि शिवकाली अशाप्रकारचे प्रगत वास्तुशिल्प साकार करणाऱ्या इंदुलकरांबद्दलच्या अभिमानाने ऊर भरून आला.
सुर्य हा उत्तरायण व दक्षिणायन असा वर्षभर फिरत असतो. त्यामुळे इंदुलकरांनी केलेली ही रचना, वर्षभरासाठी असू शकत नाही, हे सहज लक्षात येते. मग वर्षभरातले हे आश्चर्य साकार होणारे नेमके दिवस कोणते? हे ठरवण्याच्या मागे मी लागलो. त्यासाठी दरबार, नगारखाना व राजगड तोरणा यांचा दिशात्मक अभ्यास केला. दरबारात नगारखान्यापासून सिंहासनाची जागा १९० फूट लांब आहे. सिंहासनाच्या जागेची जमीनपासूनची उंची कामीत कमी ६ फूट आहे. नगारखान्याच्या कमानिची उंची १९ फूट तर रूंदी ९ फूट आहे. एखाद्या ठिकाणासाठी, सुर्याची स्थिती निश्चित करताना, ‘सोलर पाथ डायग्राम’ हा नकाशा काढतात. हा प्रत्येक अक्षांश रेखांशाने बदलतो रायगडच्या १८ अंश ते १४ अंश उत्तर या स्थितीसाठी असा सगळा अभ्यास केल्यानंतर, मी निष्कर्षाप्रत आलो की, अशी सुर्योदय स्थिती मे चा शेवट आणि जून महीन्याच्या पहील्या आठवडयापर्यंत असू शकते. माझ्या या निष्कर्षाला, आश्चर्यकारक दुजोरा मिळाला तो एका महत्वपूर्ण घटनेचा म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाची ती तारीख होती.

नगारखान्याच्या प्रवेशद्वाराची उंची ठरवताना, अंबारीसहीत हत्ती आत येऊ शकेल अशी व्यव्स्था केली होती वगैरे बरीच माहीती आपल्याला ठाऊक आहे. पण फक्त तेवढयाच कारणामुळें प्रवेशद्वाराची उंची १९ फूट ठेवली नसून, वर सांगीतल्याप्रमाणे सुर्याची किरणं सिंहासनापर्यंत पोहचू शकतील, अशा बेताने ती ठेवली आहे. हेही लक्षात घेतले पाहीजे.

Ø आवजाचे रहस्य
राजदरबारासंबंधी मला कळलेला दुसरा चमत्कार असा, की सिंहासनाच्या जागेपासून कितीही हळू आवाजात बोलल्यानंतर तो आवाज संपूर्ण दरबारात स्पष्टपणे एकू येतो. याची सत्यता पडताळून बघण्यासाठी, मी सिंहासनाच्या जागी उभा राहीलो आणि आमच्यापैकी एका सहकारयाला, नगारखान्याच्यवर जाऊन, आगपेटीची काडी पेटवण्यास सांगीतले. आणि खरोखरच मला आश्चर्याचा धक्का बसला| कारण नगारखान्यापासून सिंहासनाचे अंतर १९० फूट आहे आणि तरीही आवाज स्पष्टपणे ऐकू आला. मग या चमत्काराला वैज्ञानिक चिकित्सेच्या साहाय्याने उकलण्याचा प्रयन्त मी केला. तो असा...
दरबाराची दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे. सिंहासनाच्या जागेपासून २१ फूटांवर असलेली १२ फूट उंचीची भिंत बांधून, ही विभागणी केलेली आहे. १९० २१० फूट जागा असलेला दरबार १ फूट जाडीच्या दगडी भिंतीने बंदिस्त केलेला आहे. तिनीही बाजूच्या दगडी भिंतींची उंची १६ फूट आहे. रायगडवर वारा वेगात वहात असल्याकारणाने, या भिंती इतक्या उंच बांधल्या आहेत. या भिंतींची पडझड झाली, तर आवाजाच्या चमत्काराला अडथळा येईल. बंदिस्त जागेमध्ये आवाज घुमतो किंवा अस्पष्ट ऐकु येतो.ह्याच प्रमुख कारण म्हणजे, बाजूच्या भिंतीवरून आवाजाचे होणारे परावर्तन आणि छताच्या पृष्ठभागामूळे होणारे परावर्तन. दरबारातील अवशेषांवरून सिंहासनाची जागा वगळता, दरबाराच्या मोठया भागाला छत असू शकेल, असा कुठलाही पूरावा नाही. दरबार भरवताना आवश्यक तेंव्हा कापडाचा शामियाना घालत असावेत असे माझे मत आहे. आवाजाच्या चमत्काराचं प्रमुख कारण म्हणजे, सिंहासनाच्या जागेला, दरबारापासून वेगळ करणारी भिंत. सिंहासनाच्या सरळ रेषेत, या भिंतीमध्ये २४ फूट रूंद ओपनींग आहे. सिंहासनाची जागा जमिनीपासून कमीत कमी ६ फूटांवर होती| या सगळया एकंदर रचनेमूळे बाजूच्या भिंतीवर जाणारा आवाज अडवला जातो आणि दरबारातल्या ८० टक्के जागेवर पोहचणारा आवाज हा ‘डायरेक्ट ऍकॉस्टिकल रेंज’ मुळे येतो आणि म्हणूनच आवाज आपेक्षेपेक्षा जास्त स्पष्ट येतो. सिंहासनाची जागा आणि त्याची उंची अशी ठेवली आहे की, दरबारात कुठेही बोललेल्या व निर्माण केलेल्या आवाजाचा ‘ऍकॉस्टिकल फोकस’ सिंहासनाच्या जागी तयार होतो| त्यामुळे दरबारात कुणीही बोलले, तरी महाराजांना ऐकू जात असे.



Ø खिडक्यांची रचना
मधल्या भिंतीचे, सिंहासनासमोर आलेल्या ‘ओपनिंग’ मुळे २ भाग झालेले आहेत| त्या प्रत्येक भागात, ६ खिडक्या आहेत. त्यांची रचना उंची, रूंदी फार विचार करून ठरवलेली आहे. या सगळया खिडक्यांची सुरवात (सि लेव्हल) ही सिंहासनाच्या चौथरयापासून सुरू होते आणि दरबारातल्या उरलेल्या २० टक्के जागेवर, आवज पोहचण्याची व्यवस्था, ११ फूट रूंद व २१ फूट उंच खिडक्यांच्या मार्फत आहे, असा निष्कर्ष मी काढला आहे| दरबारात अशा जागी उभा राहीलो की जेथून सिंहासनाकडे बघीतले असता खिडकी मध्ये येत नाही| (त्यामुळे सिंहासन दिसत नाही) तेव्हा लक्षात आले की, असा सगळया जागांवर आवाज अजिबात पोहचत नाही. हा भाग ‘ऍकॉस्टिकल शॅडो’ मध्ये येतो असे म्हणता यईल पण असा भाग संपूर्ण दरबारात ६ ते ८ टक्क्यापेक्षा जास्त नाही.

Ø मनोऱ्यात कारंजे
गंगासागर तलावाला लागून बांधलेल्या मनोऱ्यामध्ये कारंजे असावेत तशा खुणा तिथे दिसतात. द्वादशकोनी असलेल्या या काळया दगडी मनापऱ्यामध्ये, चिरागदाने, शमादानांच्या केसरी प्रकाशात, थुई थुई उडणारे ते कारंजे, शिवकालात किती प्रेक्षणीय दिसत असतील असे विचार मनात आले. आणि लगेच जाणवलं की, त्या काळात ‘वॉटर पंप’ नव्हते. मग मनोऱ्याच्या पायथ्याशी असलेले गंगासागरचे पाणी, ३ ते ४ मजली मनोरयांच्या कारंजामध्ये कसे उडत असेल? आणि मग शोध घ्यायला लागलो. कारंज उडत असायचा त्या जागी वॉटर हेड शोधण्याचा प्रयन्त करता करता, जमीनतले एक छिद्र सापडले.त्या दिशेनी मग मनोऱ्याच्या भिंतीचा शोध केला. सुदैवाने एक मोठा दगड फुटलेला दिसला.त्याठीकाणी असलेल्या छिद्रातून तर चक्क २ इंच व्यासाच्या तांब्याच्या नळीचे दर्शन झाले. पण आश्चर्य असे वाटलं की हा नळ तर रजवाडयाच्या दिशेने वर जात होता. दिशा होती महाराजांच्या स्नानगृहाकडे. म्हणून मी तिकडे गेलो आणि ताबडतोब सगळा उलगडा झाला. महाराजांच्या स्नानगृहावर, पाणी साठवण्याचा हौद साधारण १२ फूट उंचीवर असावा.त्या हौदात गंगासागराचं पाणी पाणक्याच्या सहाय्याने काचडी भरून वर आणून साठवीत असावेत आणि त्या हौदातून ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पाणी मनोऱ्याच्या तीनही मजल्यावरच्या कारंजात उडत असावेत. मनोऱ्याच्या तळमजल्यापासून वरच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतची उंची कमी कमी होत जाते.
तसेच कारंजांच्या खडडयाचा घेर देखील तळमजल्यावर जास्त आहे तर वरच्या मजल्यावर कमी कमी होत जातो. या दोन्हीसाठी कारण आहे ते असं की, प्रत्येक मजल्यावरच्या कारंजाच्या वॉटर हेड्सची उंची टाकीतल्या पाण्याच्या पातळीसापेक्ष कमी कमी होत जाते. पाण्याचा जोर तळमजल्यावरच्या कारंजात जास्ती तर वरच्या मजल्यावर कमी कमी होत जातो.



                                                                                               सूरज बबन थोरात















posted under | 0 Comments

नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी''

                                                 


                                                            महाराष्ट्र माझा होता अंधारात

औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
 डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग

नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी

म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना

बसून त्यानं दख्खनच्या भूमींत
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची

नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”


एक शिवकवी 





posted under | 0 Comments

प्रतापराव गुजर


    प्रतापराव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होतो.शिवाजी महाराजांकडून त्यांना 'प्रतापराव' अशी पदवी मिळाली होती. प्रतापराव गुजर कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.
बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.
    मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.
शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला ! आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. हे सात शिपायी म्हणजे प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होत.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.    
     प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.
   प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.
महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.
पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा....................

                                                          सूरज बबन थोरात 


posted under | 0 Comments

|| छत्रपतींचे दुर्गविज्ञान! ||


महाराष्ट्र हा दुर्गाचा प्रांत! सह्यपठारावर आपण जर नजर फिरवली तर, चार-दोन शिखरांआड एखादा किल्ला तट बुरुजांचा शेला पागोटा मिरवत दिमाखाने उभा असतो. यातील बहुतेक दुर्ग श्रीशिवछत्रपतींची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानाने मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत गेलेली आहेत. अनेक पिढय़ांनी अभिमानाने सांगावा, असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचे साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षेत आहेत.. आजही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं! वयाच्या १५-१६ व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणगडापासून ते पन्नाशीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईने, अभ्यासू वृत्तीने विचार केला तर शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची दृष्टी सतराव्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येते.
-|| प्रतापगड ||-
प्रतापगड आपण अगदी पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतच दुर्गविज्ञानाची प्रचीती येते! मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ७५ पायऱ्या या एक समान नसून उंच सखल आहेत. कारण साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू! अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू एक-दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश. इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले दिसतात! किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश! दोन बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल, दगड, गरम पाणी फेकून बलाढय़ शत्रूला नामोहरम करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ या शिवप्रभूंच्या उक्तीस सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला! या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गड-किल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. आधीच सह्याद्री अभेद्य! काळ्याकभिन्न कडय़ांनी वेढलेली गिरिशिखरे, घनदाट जंगलात उतरणाऱ्या खोल दऱ्या, उंचच उंच कडे, घातकी वळणे, अडचणींच्या खिंडी, फसव्या वाटा हे सह्याद्रीचे रूप पाहत गनीम कितीही मोठा असला तरी या प्रदेशात लढाईसाठी विचार करूनच पाऊल उचलत असे!
-|| राजगड ||-
राजगडाची संजीवनी माची हा तर दुर्गरचनेचा अनोखा आविष्कारच म्हणायला हवा! संजीवनी माचीच्या तीन टप्प्यांत उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम, त्यालगत साधारण दोन मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम! या बांधकामाचं वैशिष्टय़ हे, की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त! आधीच दुर्गम भाग त्यामुळे शत्रू सैन्य आले किंवा तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासळला तरी आतला चिलखती बुरुज शाबूत राहीलच; पण बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर दोन बुरुजादरम्यानच्या अरुंद दोन मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगद लागून त्यांना ठार मारणे सुलभ जाईल, ही रचना आजही थक्क करते!
-|| विजयदुर्ग ||-
आपण आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते. १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदीयुक्त बांधकाम करून बेलाग किल्ला उभारला. शिवछत्रपतींच्या आरमाराचे मुख्यालय असलेला हा किल्ला, मराठय़ांच्या देदीप्यमान आरमारी पराक्रमाचा साक्षीदार आणि जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विजयदुर्ग! किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचे कारण कोणालाच उमजत नव्हते. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत, त्याचा हा परिणाम असावा. असाच तत्कालीन समज पसरून राहिला होता. मात्र १९ व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर गुपचूप यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचे रहस्य उमजले ते एकमेवाद्वितीयच होते. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर इंग्रजी ‘एल’ आकारात पाण्याखाली थेट समुद्रात साडेचार किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते! कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा, त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवले, की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात; परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे जहाजबांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळे त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात असत. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधली, की त्यावर या बोटी आपटून-आदळून त्यांना जलसमाधी मिळेल! त्याकाळी सागरी विज्ञान विकसित झालेले नसतानादेखील समुद्राखाली भिंत बांधून किल्ल्याला दिलेले अनोखे संरक्षण हे अनोख्या दुर्गविज्ञानाचे प्रतीकच नाही काय?
-|| सिंधुदुर्ग ||-
विजयदुर्गाप्रमाणे सिंधुदुर्ग बांधतानासुद्धा त्यांनी दुर्गविज्ञान वापरले. कुरटे बेटावर १६६४ ते ६७ मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली! यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले! शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला! किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील, अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्दुर्ग ऊर्फ कांसा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत; पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे! उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र शिवराय आणि त्यांच्या स्थपतीजवळ होते, त्याला शास्त्राची जोड होती हेच सिद्ध होत! खांदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी वेगळेच तंत्र वापरले. त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबड-धोबड दगड, चिरे असे बेमालूम पेरले, की भरतीच्या वेळीही दगड दिसावेत. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख-शिंपल्यांची वाढ होऊन त्याच्या धारदार कडांमुळे खडकावर वावरणे अशक्य होऊन बसले. कारण त्याकाळी पादत्राणे ही कच्च्या चामडय़ाची असत. समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणे खराब करून टाकीत. त्यामुळे चपला घालता येत नाही आणि चालताही येत नाही, अशा परिस्थितीमुळे लढणे जिकिरीचे होई. शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडावर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत पाणी न पोहोचू देण्याची पद्धत शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरीत्या वापरली!
-|| कुलाबा ||-

कुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवले आहेत. लाटांचा जोर हा जास्त असल्याने या भिंतीवर लाटा आपटल्या, की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो. ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली, अन् आज साडेतीनशे वर्षांनंतरही या किल्ल्यांच्या बांधकामातील एक चिराही सरकलेला नाही! दुर्गनिर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजाजवळ काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखविले जातात; परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. हे न पटणारे आहे. रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढण चढून शत्रू सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजाजवळ वेगाने वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्याने, चिखलराडय़ाने शत्रू सैन्याचा धीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या मागचा उद्देश! साठवलेल्या पाण्यातून दुर्ग संरक्षण करण्याचा कल्पक हेतू मनी बाळगणारे शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे होत!
तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जे किल्ले, दुर्ग बांधले तेथे शौचकुपाची व्यवस्था होती. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांवर आजही अगदी सुस्थितीत असलेले शौचकूप पाहणे रोमांचकारी आहे. त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आवर्जून पाहण्यासारखे आहे. ज्या काळात अभियांत्रिकी किंवा स्थापत्यशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या संस्था नव्हत्या. दुर्गबांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याएवढे राजकीय स्थैर्य नव्हते, राज्यात कधीही परकीय दमनचक्र येणाऱ्या काळात, स्वकीय, तसेच परकीयांशी झुंजण्यात कालापव्यय होत असताना शिवाजी महाराजांचे असे एकमेवाद्वितीय, शास्त्रीय आधारांवर दुर्गबांधणीचे प्रयोग त्यांची दुर्गबांधणीतील वैज्ञानिक बैठक ही आश्चर्यकारकच आहे.

महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.

                                                                                                  सूरज बबन थोरात




posted under | 0 Comments

                                                          नेताजी पालकर
    
        नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.
           पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
        शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
     शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.


                                                                                             सूरज बबन थोरात













posted under | 0 Comments

येसाजी कंक

येसाजी कंक,जेव्हा छत्रपती शिवराय हे राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते त्यावेळी आदिलशाही संपवण्यासाठी त्यांनी कुतुबशहाशी हातमिळवणी केली होती. कुतुबशहाने भेटीच्या वेळी विचारले की"मराठा सैन्यामधे हत्ती कां नसतात..?"त्याबदल्यात शिवरायांनी उत्तर दिले होते की"स्वराज्याच्या सैन्यातील प्रत्येक मावळा हा हत्तीवर भारी पडू शकतो."तेव्हा येसाजी कंक यांनी आपल्या राजाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी म्हणून आखाड्यात उडी घेतली. त्यांनी हत्तीशी एकट्याने झुंज दिली व हत्तीस पळवून लावले.

येसाजी शांतपणे मैदानातून वर आला.शामियान्यात येवून त्याने मुजरा केला.घामाने डवरलेल्याराजांनी येसाजीला मिठी मारली,आपल्या हातातील रत्नखचित सलकडी येसाजीच्या हाती घातली.काही न बोलता राजे परत बसले.तानाशहानी येसाजीवर देणग्यांची खैरात केली.येसाजी कुतुब्शाहीच्या दरबारी राहील,तर पंचहजारांची मनसब द्यायला कुतुबशहा तयार झाले.येसाजी मुजरा करून म्हणाला,"मी महाराजांचे अन्न खातो.ते आपलच आहे त्यापेक्षा जहागिरी का जास्त आहे?"त्या उत्तराने तानाशहा आणखीन खुश झाले.ते राजांना म्हणाले,'महाराज,हा तुमचा माणूस आम्हांला द्या'राजांचा हात गळ्यातल्या नवरत्नांच्या कंठ्यांशी गेला. राजांनी हसून विचारले,"या कंठ्यातलएखाद रत्न निखळल,तर काय होईल?'कंठ्याची शोभा जाईल!'"हजरत आम्ही कंठा वापरतो,तो हौसेसाठी नाही;न ऐश्वर्याच्या प्रदर्शनासाठी.ह ा कंठा या माणसांची आठवण आहे.यातला प्रत्येक माणूस हा आमच्याच तोलामोलाचा आहे.आमचे राज्य हत्तीच्या बळावर नव्हे,यांच्या आधारावर सुरक्षित आहे.एक एक माणूस मिळवून माळेस मनी जोडले आहेत.ते मनी कसे काढता येतील?"तानाशाह निरुत्तर झाले.त्यांना काही तरी एकदम आठवले.ते राजांच्याकडे वळून विचारते झाले,'एक विचारू?''संकोच कसला?''जेव्हा तुमचा माणूस हत्तीशी झुंजत होता,तेव्हा आपली नजर खाली का वळली होती?आपल्या कपाळी घाम का आला होता?असल्या झुंजीची भीती वाटते?'"आपका कहना दुरुस्त है.'राजे म्हणाले."हि जीवाला जीव देणारी माणसं,वेळ का सांगून येते?घात,अपघात होतात.चुकून पाऊल फसतं.करमणुकीपायी असे मोहरे खर्ची टाकण्याची सवय आम्हांला नाही.आपल्या इच्छेखातर आम्ही येसाजीला पाठवला;पण तो माघारी येईपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता."

                                                                                                                       
                                                                                                                              सूरज बबन थोरात




posted under | 0 Comments

"साहेब"

मराठीचा श्वास तूम्हीं
हिंदुत्वाचा प्राण तुम्ही
शिवरायांचा बाणा शिकाविला
महाराष्टाचे वाघ तुम्ही..........१
विचारांची मूर्ती तुम्ही
पराक्रमांची कीर्ती तुम्ही
सावरकरांचे हिन्दुराष्ट घडविले
निष्ठावान शिवभक्त तुम्ही...........२
व्यंगचित्राचे हत्यार तुमचे
मार्मिक आहे कट्यार तूमची
सामना तिचा करावयाला
हिम्मत न होई कुणाची .................३
वागलास कितीही कठोर तुम्ही
अंतरी मात्र निर्मल तुम्ही
कर्मासाठी लढणे शिकविले
हिंदुहृदय सम्राट तुम्ही

                                                                                कवी :-  एक शिवसैनिक 





posted under | 0 Comments

अजिंक्य  जंजीरा 


महाराष्ट्राला मोठा सागर किनारा लाभला आहे. अनेक खाड्यांमुळे हा सागर किनारा दंतुर झालेला आहे. सृष्टिसौंदर्याने नटलेल्या या सागर किनाऱ्याजवळ अनेक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक घटनांना उजाळा देणारी अनेक स्थळे आहेत. या किनाऱ्यावर असलेल्या जलदुर्गांमध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.


जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यत: कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूचे काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.
पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.


जंजिऱ्याचा पुरातन झेंडा
जंजिऱ्याचे सिद्दी हे मुळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुऱ्हाखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका."
या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी य किल्ल्यानजीक पाच सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.
किल्ल्याची अवस्था

जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.
किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.
जंजिऱ्याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात सागरातील कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.'
असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.



                                                                                                                सूरज बबन थोरात


posted under | 0 Comments

छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र 



संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.  शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा  आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.  संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर  पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली.  त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात  त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते.  राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी  आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग  होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर  नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या  कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती  आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे  शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला  ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या  उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून  दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे  स्वराज्यात येऊन पोहोचले.



तारूण्य आणि राजकारण्यांशी मतभेद

१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे  राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले  होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या  प्रतिनिधींना जिंकून घेतले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन  झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही.  शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.  सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील  अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य  संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता.  शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे  त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य  करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब,  हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले  आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या  विरोधात गेले.

सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक  देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण  हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या  अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला.  त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून  संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय  शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे  दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून  जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक  वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील  मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस  म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की  शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.


मोगल सरदार

या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी  शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील  व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड  या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने  लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली.  संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी  दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७००  मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा  भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून  तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या  अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही.  संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील  पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.

संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले.  त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली  नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या  स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर  मानकर्‍यांमधील दरी अजूनच रूंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना  राजारामच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे  राजारामच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी  संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.

सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा  हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा  राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव  मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे  सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार  होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व  सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा  प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते.  राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची  हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला  आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना  त्यांच्या इच्छेविरूद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले  होते. सोयराबाईंनी संभाजीराज्यांना जेवणातून विष खाऊ घालण्याचाही प्रयत्न  केला होता, अशी इतिहासात नोंद आढळते; पण ते बचावले असे वाचायला मिळते.[  संदर्भ हवा ]

 छत्रपती

१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार  अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना  अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो  आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून  राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी  दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य  सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या  सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी  १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या  सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली  मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे  ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या  सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण  मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना  तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज,  जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा  शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही.  यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले  नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही.  संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण  झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर  होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के,  महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला  सामील झाले.



पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने  पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे  कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी  औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल  इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची  म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब  महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय  केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता ?

शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते ,  त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची  ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि  रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले  होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी  मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर  मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता  झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती  भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा  काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही  घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता  येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके  संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबालासुद्धा लगावलेले आहेत.

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले  तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी  अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या  हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र  असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी  आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं .  त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना  आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे  बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच  हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती  आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत  कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून  आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून  मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर  त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .’


दगाफटका

१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना  बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे  रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा  सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी  शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक  केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी  होते.प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले  नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.



शारीरिक छळ व मृत्यू

त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे  बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व  किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य  केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे  आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड  काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा  औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला.  सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी  स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड  काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि  कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर  विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील  शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी  काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल  गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी  लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी  फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला  घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.

अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही  उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर  दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत  होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा,  महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला  होता.

पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या  संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी  नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या  तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज  करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी  महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा  मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.

बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे  पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी  कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला.  कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने  बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन  छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही  जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने  आवघी छावणी गर्जत होती.

कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या  अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास  घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी  योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी  श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून  बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.

दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि  दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या  राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा  दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा  डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह  यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची  चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या  दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे  धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील  आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!

मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

                                                                                                     
                                                                                                                       सूरज बबन थोरात





posted under | 0 Comments
Newer Posts Older Posts Home

वाचक

Designed by WebQuest. Powered by Blogger.

सह्याद्रि

Blog Archive

Followers


Recent Comments