शिवरायांचे खासगी आयुष्य


आपल्या सगळ्यांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल खुप कुतुहल असतं. शिवाजी महाराज स्वभावने कसे असतील, लढायांव्यतिरीक्त त्यांचं आयुष्यं कसं असेल, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. शिवछत्रपतींविषयीच्या अस्सल साधनांतून यातल्या काही प्रश्नांची उत्तरे पुर्ण स्वरूपात नाही, पण अंशतः शोधता येतात...शिवाजी महाराजांच्या स्वभावाविषयी बखरींतून अन् पत्रांतून काही अंदाज बांधता येतात. ते असे की, शिवाजी महाराज स्वभावाने शांत पण तितकेच उग्र होते. विशेषतः भडकले म्हणजे कोणालाही आवरता येणार नाहीत असे. इंग्रजांचे शासन हे अतिशय शिस्तप्रिय होते असे बोलले जाते, परंतू महाराजांचे शासन हे त्याहूनही शिस्तबद्ध, काटेकोर आणि अतिशय स्पष्ट होते. महाराजांच्या शिस्तबद्धतेची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतात. शिवाजी महाराजांच्या लहानपणी जिजाबाई आईसाहेबांच्या रांझे गावातील बाबाजी बिन भिकाजी गुजर या पाटलाने एका स्त्रिवर बदअंमल म्हणजेच बलात्कार केला. हे समजताच शिवाजी महाराजांनी ताबडतोब त्याला पकडून आणून त्याचा चौरंगा करण्याचा हुकूम सोडला. चौरंगा म्हणजेच, कोपरापासून दोन्ही हात आणि गुढघ्यापासून दोन्ही पाय तोडणे ! पुढे अफजलखान स्वारीच्या वेळी मावळातील सारे देशमुख महाराजांच्या बाजूने लढले, पण उत्रवळीचा खंडोजी खोपडे देशमुख मात्र वतनाच्या हव्यासापोटी खानाला जाऊन मिळाला. पुढे महाराजांनी खानाला मारले, पण खंडोजी मात्र पळाला. तो अतिशय घाबरलेला होता. आपले जावई हैबतराव शिळमकर यांच्यामार्फत त्याने कान्होजी नाईक जेधे देशमुख यांच्याशी गुप्त बोलणे लावले. शेवटी कान्होजींनी खंडोजीसाठी महाराजांकडे शब्द टाकला. कान्होजीराजांसारख्या ज्येष्ठाचा शब्द महाराजांनीही मानला आणि खंडोजीला अभय दिले. एके दिवशी खंडोजी महाराजांकडे मुजरा करायला आला असता महाराजांनी एकदम त्याला पकडण्याचा आदेश दिला. खंडोजीला जेरबंद करण्यात आले. त्याचा डावा हात आणि उजवा पाय कलम करण्यात आला. मग महाराजांनी खंडोजीला अभय दिले होते ना ? तरीही शिक्षा का केली ? इथेच खरे शिवाजी महाराज समजतात ! त्यांनी खंडोजीला जिवाचे अभय दिले परंतू शिक्षा केली कारण लोक म्हणतील की स्वराज्यात कोणताही गुन्हा केला तरी चालतो, फक्त कान्होजी जेध्यांसारखा वजनदार वशिला हवा बस्स ! तर तसे होणे नाही...राज्याभिषेकाच्या आधी, १५ एप्रिल १७३३ रोजी, सरनौबत प्रतापराव गुजर यांनी विजापूरचा सरदार बहलोलखान पठाण शरण येऊन हातात आला असतानाही त्याला मोकळे सोडून दिले. परंतू प्रतापरावांनी ही फार मोठी चूक केली होती. कारण महाराजांनी त्यांना स्वारीवर निघतानाच महाराजांनी त्यांना बजावले होते, “ जो कोणी सरदार- सेनापती येईल त्याला शक्य तोवर जिवंत कैद करा. अगदीच जमलं नाही तर बुड्वा, मारा !”. पण प्रतापरावांनी त्याला जिवंत मोकळा सोडून दिला. शत्रूवर कधीही भरवसा ठेवायचा नसतो. बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालून आल आणि येताना पूर्वीपेक्षा दुप्पट सैन्यासह ! महाराजांना हे पाहून फार राग आला. रागाच्या भरात त्यांनी प्रतापरावांना एक खरमरीत पत्र लिहीले, “ सल्ला काय निमित्य केला ? सल्ला करण्याचा अधिकार तुमचा नव्हे ! तो अधिकार आमचा व राजमंडळाचा. तुम्ही स्वतःस सेनापती म्हणवता मात्र केलीत ती फक्त शिपाईगिरी. आता बहलोलखान हरघडी येतो, तरी त्यास गर्देस मेळविल्याविना आम्हांस रायगडी तोंड दावू नये ! ”. महाराजांचा खरा राग बहलोलखानावर होता, पण महाराज आपल्यावरच नाराज झाले आहेत असे प्रतापरावांना वाटले. लवकरच महाराजांचा राज्याभिषेक होता. अशा वेळी रायगडावर अष्टप्रधानांतील सात प्रधान उपस्थित राहणार होते, पण सरसेनापती मात्र तेथे नसणार होते. म्हणून शेवटी सूडाच्या भावनेनी पेटलेल्या प्रतापरावांनी अवघ्या सात सैनिकांच्यानिशी गडहिंग्लज-नेसरीच्या जवळच असणार्याप बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला चढवला. चाळीस हजारांच्या फौजेवर अवघे सात जण तुटून पडले. शेवटी व्हायचं तेच झालं, प्रतापराव मारले गेले. शिवाजी महाराजांना प्रतापरावांच्या मरणाचा फार मोठा धक्का बसला. त्यांचं मन कळवळलं. आपल्या केवळ एका पत्रामूळे प्रतापरावांनी आत्महत्या केली होती. महाराजांनी प्रतापरावांच्या कुटूंबाचं सांत्वन केलं. प्रतापरावांच्या मुलाला, नागोजी उर्फ शिदोजी बिन कुड्तोजी गुजराला त्यांनी सिंहगडासारख्या महाबलाढ्य किल्ल्याची किल्लेदारी दिली. पुढे प्रतापरावांच्या मुलीचा, जानकीबाई हीचा विवाह आपले धाकटे पुत्र राजाराम यांच्याशी लावून दिला. पण याच नागोजी उर्फ शिदोजी गुजराने पुढे एक चूक केली. जेजूरीच्या घडश्यांना चिंचवडकर देवांच्या सांगण्यावरून सिंहगडावर कैदेत डांबले, तेव्हा शिवाजी महाराजांनी नागोजीला सख्त ताकीद दिली. त्यावेळेस त्यांनी त्याला सहानुभूती दाखवली नाही. शिवाय चिंचवडकर नारायण देवांनाही त्यांनी ठणकावीले, ‘तुमची बिरदे आम्हांस द्या, व आमची बिरदे तुम्ही घ्या !’ म्हणजे तुम्ही राज्यकारभार करा, आम्ही तुमच्या जागी चिंचवडास जाऊन धुपारत्या करत बसतो !महाराज हे अतिशय कलाप्रिय होते. शाहीर अज्ञानदासासारख्या आणि यमाजींसारख्या शाहीरांकडून ते अनेक पोवाडे ऐकत असत. केशव पंडित, कविंद्र परमानंद नेवासकर, यांसारख्या महापंडितांकडून विविध विषयांवर ज्ञान घेवून त्यांच्याबरोबर चर्चाही करत असत. मोकळ्या वेळात अनेक सवंगड्यांबरोबर, शास्त्री-पंडितांबरोबर आणि कलावंतांबरोबर उठता-बसता महाराजांचे मन फुलत गेले आणि त्यांची बुद्धीही समृद्ध होत गेली. महाराजांच्या गडकोट बांधणी, न्यायनिवाड्यांवरून, पत्रांवरून त्यांचा राज्यशास्त्रावर, व्यवहारशात्रावर, खगोलशास्त्रावर, वास्तुशास्त्रावर इतिहास-पुराणांवर आणि परमार्थावर किती अभ्यास होता हे कळून येते. मराठी भाषा ही संस्कृत भाषेची धाकटी बहीणच आहे. त्यामुळे महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून ‘राज्यव्यवहारकोश’ या ग्रंथाची निर्मिती केली. राज्यव्यवहारतल्या पेशवे, सुरनिस, मुजुमदार, सरनौबत, डबीर अशा शब्दांना पंतप्रधान, पंतसचिव, सरसेनापती, पंतअमात्य, पंतसुमंत अशी अस्सल मराठी नावे दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझा मराठाची बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके, मेळविन ॥’ अशा शब्दात गौरव केला. पण नंतर मराठी भाषा हळूहळू लयाला जात चालली होती. संत नामदेव, संत एक्नाथ, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या अमृतवाणीतून मराठीचे काही झरे पाझरत होते. शिवाजी महाराजांनी मराठीला एक नवी संजिवनी देण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या पूर्वीच्या पत्रांच्या सुरवातीला लिहिण्यात येणारा ‘मशहुरूल अनाम, अजरख्तखाने, वजारतमाब..’ असा मायना शिवाजी महाराजांनी कायमचा बदलून त्याठिकाणी ‘अखंडीत लक्ष्मी अलंकृत, सकळ गुणालंकरण, राजश्रीया विराजीत, विश्वांसनिधी..’ अशी अस्सल मराठी विशेषणे लावयला सुरुवात केली.शिवाजी महाराज स्वभावने खेळकरही होते. आपल्या समोर शिवाजी महाराजांची मूर्ति उभी राहते ती अंगात चिलखत घातलेली, डोक्यावर शिरस्त्राण असलेली, पाठीवर ढाल आणि कमरेला भवानी तलवार अडकवलेली ! पण हा महाराजांचा युद्धवेश होता. इतर वेळेस महाराजांचे कपडे अगदी साधे असत. गळ्यात मोजकेच अलंकार आणि कुलदेवता भवानीदेवीच्या कवड्यांची माळ. महाराजांना दोन पुत्र व सहा कन्या होत्या. महाराज त्यांच्याशी गप्पगोष्टी करण्यात व आपल्या राण्यांशी बोलण्यातही वेळ व्यतित करत असत. महाराजांची आजपर्यंत अस्सल अशी सात चित्र सापडली आहेत. ती चित्र द्विमितीय (प्रोफाईल) आहेत. पण या सर्व चित्रांतील शिवाजी महाराजांच्या मुखावर सूक्ष्म असं स्मितहास्य पसरल्याचं दाखवण्यात आलं आहे. जसं महाभारतात भगवान श्रीकृष्णाच्या चेहर्यारवर असतं. असे होते शिवाजी महाराज !आता शिवाजी महाराजांच्या लढायांव्यतिरिक्तच्या रोजच्या दिनचर्येबद्दल पाहू. महाराज वर्षातले बाराही महिने लढायला जात नसत हे तर उघडच आहे. अशा वेळी त्यांचा मुक्काम शक्य तोवर राजधानीवरच असे. स्वराज्याच्या सुरूवातीपासून इ.स. १६७२ पर्यंत राजगड हीच राजधानी होती. नंतर महाराजांनी राजधानीची जागा बदलून ती रायगडावर नेली. या काळात ते स्वराज्यातील इतर मुलकी कारभार पाहत असत. किल्ल्यांना वेळोवेळी भेटी देऊन त्यांच्या डागडुजीसंबंधी आज्ञा देणे, किल्ल्यांवरच्या सरदारांच्या नियुक्त्या करणे, किल्ल्यावर आणि फौजांना वेळच्या वेळी तोफा, दारुगोळा तसेच धान्यसाठा पुरवणे अशा अनेक कामांवर या मधल्या काळात देखरेख करावी लागत असे. महाराज पहाटे लवकर उठून स्नान आणि नित्याच्या स्फटीक शिवलिंगाची पुजा करत असत. नंतर आईसाहेबांचं दर्शन घेऊन, त्यांच्याशि बोलून गडावरच्या सदरेवर बसून न्यायनिवाडे, तंटे सोडवून लोकांचे प्रश्न सोडवले जात असत. बाळाजी आवजी चित्रे चिटणीसांना महाराज पत्राचा आशय सांगत असत. दुपारचे भोजन झाल्यानंतर वामकुक्षी घेतल्यानंतर महाराज गडाचा फेरफटका मारायला जात असत. रायगडावर असताना महाराज सायंकाळी श्री जगदिश्वराच्या दर्शनाला जात असल्याच्या नोंदी मिळाल्या आहेत. रात्रीच्या जेवणानंतर ते पुन्हा सदरेवर येत असत. या वेळी बाळाजी आवजी चिटणीसांनी तयार केलेल्या पत्रांवर नजर टाकून महाराज त्यांना पत्रातील काही गोष्टी सुचवत असत, आणि नंतरच ते पत्र पाटवण्याची आज्ञा दिली जात असे. त्यानंतर महाराज झोपायला जात असत. महाराजांच्या पदरी पंताजी गोपिनाथ बोकील नावाचे एक हुशार ब्राह्मण कारभारी होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी खानाला वेळीवेळी झुकवून प्रतापगडच्या पायथ्याशी आणण्याचे महत्वाचे कार्य याच पंताजीपंतांनी केले होते. मुळात ते महाराजांचे वकीलच होते, पण अशा या पंतांबद्दल एका पत्रात म्हटलय, ‘पंताजी तो काका, त्यांचा मायना ऐसा, की आऊसाहेबांच्या संगतीस बैसोनु चौसर खेळावा’. महाराजांनाही चौसर म्हणजेच सारीपाट आवडत असे...तर असे होते शिवाजी महाराज... महाराजांबद्दलच्या काही नोंदी आणि इतिहासकारांनी केलेल्या संशोधनातून, आणि अस्सल साधनांच्या वाचनातून ही माहिती संकलीत करून आपणापुढे मांडली आहे. काही त्रुटी अथवा चूक झाली असल्यास क्षमस्व.. बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.



                                                                                          सूरज बबन थोरात





posted under |

0 comments :

Newer Post Older Post Home

वाचक

Designed by WebQuest. Powered by Blogger.

सह्याद्रि

Blog Archive

Followers


Recent Comments