।। किल्ले वासोटा (व्याघ्रगड) ।।



इतिहास : 

या किल्ल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व होते. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. १६५६ मध्ये शिवाजीराजांनी जावळी प्रांताबरोबरच या वासोटा किल्ल्याचाही स्वराज्यात समावेश केला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे.
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत 'वसिष्ठ' हे नाव अपभ्रंश होऊन 'वासोटा' झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत 'वसंतगड' या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोटा बखरीवरून शिवरायांनी जावळी
विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोटावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

सह्याद्रीची मुख्यरांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते . या जावळी खोऱ्यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरु होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपण गडात प्रवेश करतो. या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने गेल्यावर आपण पूर्वेकडील बाजूस पोहोचतो. या बाजूने दिसणारा शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते.

गडावर कसे जाल :

वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जाऊ शकतो.
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.

राहण्याची सोय:  राहण्याची सोय नाही.

पाण्याची व जेवणाची सोय : स्वतःच करावी.

जाण्यासाठी लागणारा वेळ: साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो.


                                                                           सूरज बबन थोरात



posted under |

0 comments :

Newer Post Older Post Home

वाचक

Designed by WebQuest. Powered by Blogger.

सह्याद्रि

Blog Archive

Followers


Recent Comments